दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी येथे गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विशाल शिवाजी कोरडे (वय २३) राहणार निर्मल विहार दिंडोरी, असे या युवकाचे नाव आहे. नाभिक समाजाचे युवक कार्यकर्ता असलेला विशाल हा सकाळी नळाला पाणी आल्यावर रो हाऊसच्या वर असलेल्या टाकीवर पाणी पाहायला गेला होता. टाकी भरल्याचे लक्षात आल्यावर त्याने आईला आवाज दिला.
यावेळी गॅलरीतून तोल गेल्याने तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला मार लागून अधिक रक्तस्राव झाल्याने त्याचे निधन झाले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात त्यास मृत घोषित करण्यात आले. दिंडोरी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते शिवाजी कोरडे यांचा तो मुलगा होता. ही घटना सकाळीच घडल्याने निर्मला विहार परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पीआय अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नंदू वाघ करत आहेत.