नाशिक - पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून निफाड तालुक्यातील ७ गावातील महिलांनी निफाड तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. पुढील २ दिवसात पाणी मिळाले नाही तर, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पालखेड धरणातून दुष्काळग्रस्त येवला आणि मनमाडला पाण्याचे आवर्तन सोडले जात आहे. पाणी सोडण्यात येणाऱ्या मार्गात निफाडच्या उत्तर भागात असलेली उगांव, शिवडी, खेड, वनसगाव, सारोळे, धामणगाव, नांदुर्डी, सोनवाडी आदी गावात गेल्या महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आणि पाणी साठवणारे बंधारे देखील कोरडेठाक पडले आहे.
तीव्र पाणीटंचाईमुळे गावातील नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच महिला व लहान बालकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागत आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटावे म्हणून पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्यासाठी पाणी सोडावे. पाणी साठवण बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी करत आज या ७ गावातील महिलांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच पालखेड डावा कालव्याचे आवर्तन सोडल्यापासून लगतच्या गावांचा २२ तास वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश मागे घ्यावे अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अवघ्या २ तासाच्या वीज पुरवठ्यात पाणी उपसा करता येत नाही. त्यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. पालखेड डावा कालवा अंतर्गत असलेल्या गावांना कमीत कमी पाच तास अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा. जेणेकरून गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी वस्तीवरील शेतकरी कुटुंबे व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशा प्रकारचे निवेदन करण्यात आले आहे.