नाशिक - उसने घेतलेले पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावल्याने, नाशिकमध्ये 23 वर्षांच्या विवाहित महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. म्हसरूळ परिसरात ही घटना घडली होती. दरम्यान या हत्येप्रकरणात पोलिसांनी फरार संशयित आरोपी रिक्षाचालक सागर भास्कर उर्फ आदेश याला ताब्यात घेतले आहे.
२३ वर्षीय विवाहित महिलेची रिक्षाचालकाने हत्या केल्याचं उघड
उसने घेतलेले 80 हजार रुपये परत मिळावेत, यासाठी या महिलेने रिक्षाचालक असलेल्या सागरकडे तगादा लावला होता. म्हणून आरोपीने या महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे समोर आले आहे. 20 जानेवारीला ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सागर भास्कर याला ताब्यात घेतले आहे.
सागर आणि मृत महिलेमध्ये होते प्रेमसंबंध
संशयित आरोपी सागर आणि हत्या झालेल्या महिलेमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळख होते. या महिलेने आरोपीला 80 हजार रुपये दिले होते. मात्र दिलेले पैसे ती परत मागत असल्याने, त्याचा राग मनात धरून पैसे देतो असे सांगून सागरने या महिलेला म्हसरूळ भागातील पवार मळ्याकडे असलेल्या नाल्याजवळ नेत, तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.