नाशिक- प्रसूतीकळा असह्य झालेली महिला महानगरपालिकेच्या मोरवाडी रुग्णालयात आली होती. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या महिलेला घरी परत पाठवले. यानंतर घरी निघालेल्या महिलेला वाटेतच प्रसूतीच्या कळा असह्य झाल्याने नगरसेविका डोमसे आणि इतर महिलांनी गर्भवती महिलेची प्रसूती भर रस्त्यात केली. महापालिका रुग्णालयाच्या अनास्थेमुळे महिलेला या प्रसंगाला सामोरे जावे लागले.
हेही वाचा-नाशकात रुग्णाचे नातेवाईकच स्मशानभूमीत नेतात कोरोनाबाधितांचा मृतदेह
संगीता लोंढे ही महिला प्रसूतीसाठी नाशिक महानगरपालिकेच्या मोरवाडी रुग्णालयात गेली होती. मात्र, येथील डॉक्टरांनी या महिलेला रुग्णालयात दाखल न करता घरी पाठवले. यानंतर काही अंतर घराकडे जात असताना ही महिला चक्कर येऊन रस्त्यावर पडली. यावेळी नगरसेविका भाग्यश्री डोमसे यांनी तात्काळ परिसरातील महिलांच्या मदतीने या महिलेची प्रसूती भर रस्त्यात केली.या महिलेने एक गोंडस मुलीला जन्म दिला.
भाजपा नगरसेविका भाग्यश्री डोमसे यांचे पती राकेश डोमसे यांनी हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागाचे वाभाडे काढले केले गेले आहेत. मात्र, डोमसे हे ज्या पक्षाच्या नगरसेविका आहेत त्याच भाजपाची महापालिकेत सत्ता असल्याने सत्ताधाऱ्यांचे आरोग्य प्रशासनावर नियंत्रण आहे का ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.