नाशिक - दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे गेल्या चार वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने गावातील एका शेतकऱ्याची गाय फस्त केली होती. त्यानंतर, या बिबट्याने काल(22 डिसेंबर) एका वासराला जखमी केले होते तर, आज एका वासराची बिबट्याने शिकार केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कुत्र्यांची बिबट्याने शिकार केल्याच्या घटनादेखील परिसरात सामान्य झाल्या आहेत. दरम्यान, या सर्व घटनांची तक्रार देऊनही वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
हेही वाचा - बिबट्यापासून संरक्षण करणारी प्लास्टिकची तोफ!
काल सायकांळी सव्वा सातच्या सुमारास हा बिबट्या मानवी वस्तीतही आला होता. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर त्याने पळ काढला. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून बिबट्याला पकण्यासाठी कुठलेही प्रयत्न होत नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. वनविभागाने त्वरित यावर उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.