नाशिक - महामार्गावरील घोटी सिन्नर फाट्याजवळ मुंबईला कांदे घेऊन जाणाऱ्या टेम्पोची पोलिसांनी झडती घेतली असता ९ किलो गांजासह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सध्या कोरोनो विषाणू संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र, या बंदमध्येही मादक पदार्थाची वाहतूक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बिनधास्तपणे चालू असल्याचे समोर आले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथे सिन्नर फाट्याजवळील मुलचंद घोटी गार्डनजवळ घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक पळे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या वाहनांची तपासणी चालू होती. रविवारी दुपारच्या सुमारास अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली छोटा हत्ती (एम. एच. ०४ जे. के. ९६३७) टेम्पोतून मुंबईला कांदे घेऊन जात होता.
पोलिसांना पाहताच या टेम्पोतील चालक पळून गेला. पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता कांद्याच्या गोण्याखाली प्लास्टिकमधे पॅक केलेले मादक पदार्थ गांजाचे ९ किलोचेे पाकीट आढळून आले. या गांजाची किंमत अंदाजे १ लाख २९ हजार रुपये, टेम्पो ३ लाख रुपये, कांदे ६ हजार ३०० रुपये असा ४ लाख ४१ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
टेम्पोतील संशयित सादीर साबीर शेख, (वय २२ वर्ष, राहणार मुंब्रादेवी मंदीर, मुंब्रा, जिल्हा ठाणे) यास ताब्यात घेतले असून दुसरा संशयित रईस राहणार मुंब्रा पूर्ण नाव माहीत नाही, हा फरार झाला आहे. या बाबत घोटी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विलास आनंदा घिसाडी यांनी तक्रार दिली असून विना परवाना मादक पदार्थाची वाहतूक कलम कायद्याअंतर्गत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.