नाशिक - शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा भद्रकाली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामधील दोन आरोपींना गजाआड करत त्यांच्याकडून तब्बल 5 लाख 48 हजार 500 रुपयांचे 38 मोबाईल जप्त केले आहेत. हे सर्व मोबाईल जिल्ह्यातील विविध भागातून चोरी केल्याची त्यांनी माहिती दिली आहे,या सराईत गुन्हेगारांकडून इतर ही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या पूर्वीही दाखल आहेत मोबाईल चोरीचे गुन्हे
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील अनेक ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच भद्रकाली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मोबाईल रिपेअर करून विकणाऱ्या दोघा मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच चोरट्यांकडून जवळपास 5 लाख 48 हजार 500 रुपयांचे 38 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून संशयितांच्या नावावर याआधी देखील विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यानी सांगितले आहे.
या प्रकरणी शकीफ तोफिक शेख आणि मोहम्मद आमीन अब्दुल रहीम अन्सारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे संशयित मूळचे मालेगाव येथील रहिवासी असून काही वर्षांपासून जुने नाशिक परिसरात वास्तव्यास होते. यात एकमेकांच्या मदतीने ते वेगवेगळ्या परिसरात मोबाईल चोरी करत असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २८ जानेवारीला