नाशिक - जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ शिवारातील करकलीच्या नाल्यात जनावरांची वाहतूक करणारी पीक-अप गाडी उलटली. या अपघातामध्ये दोन गायींचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या दोन गायी व एक बैल यात बचावले आहेत.
ही गुरांची व गाईचा वाहतूक करणारा पिक-अप गाडी क्र. एम. एच. १५ ईजी १५९१ मधून एक बैल व चार गायींना घेऊन नाशिककडे जात होता. पळशेत व म्हैसमाळ दरम्यान घाटातील वळणावर करकली नाल्याजवळील मोठ्या खड्ड्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. झालेल्या या अपघातात दोन गायींचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या दोन गायी व एक बैल थोडक्यात बचावले. अपघातानंतर चालक फरार झाला. परिसरातील म्हैसमाळ, देवळा, गळवड येथील ग्रामस्थांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी मदतीसाठी धावून गेले.
त्यांनी मृत गायींना खड्ड्यातून बाहेर काढले. बचावलेल्या जनावरांना बाटलीने पाणी पाजले. बाऱ्हे पोलिसांना माहिती दिल्यावर अतिरिक्त पोलीस निरीक्षक आर. बी. लोखंडे, हवालदार राजेंद्र दंडगव्हाणे, दिनकर महाले, रामदास चौधरी, होमगार्ड लहाणू गुंबाडे, चंद्रकात शेवरे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून जखमी गायींवर उपचार केले. याप्रसंगी परिसरातील अपघातातून वाचलेल्या जनावरांना नागरिकांनी चारा उपलब्ध करून दिला. कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केली जात असावी, अशी चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये सुरू होती.