नाशिक - जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लोणवाडी भागातील शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा ( Two brothers drowned lonwadi Niphad ) मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गौरव गायकवाड आणि कुणाल गायकवाड अशी मृत मुलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणवाडी भागातील सात वर्षांचा गौरव गायकवाड आणि चार वर्षांचा कुणाल गायकवाड हे दोघेही घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते. खेळता खेळाता लहानगा कुणाल शेततळ्यात पडला. ते पाहून गौरव ने आरडाओरड केला. मात्र, परिसरात कोणीच नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. शेवटी कुणालला वाचवण्यासाठी गौरव पाण्यात उतरला. मात्र, खोल असल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही. त्यामुळे, काही वेळानंतर या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत निफाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे : शाळेच्या परीक्षा संपत असल्याने मुलांना आता सुट्या लागणार आहेत. तसेच उन्हाळा असल्याने अनेक मुलांचा ओढा पाण्याकडे जास्त असतो. अशात नदी, तलाव, डॅम आदी भागात मुलांची पोहण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे, अनेकदा पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडत असतात. त्यामुळे, पालकांनी मुलांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात आढळला बिबट्याचा बछडा; सैरभैर झालेल्या बिबट्याच्या मादीचा वनविभागाकडून शोध