नांदगाव (नाशिक) - अतिवृष्टीमुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीने शेतीचे नुकसान होऊनही कोणत्याही प्रकारे परतावा विमाकंपनीने दिला नसून एकट्या नांदगांव तालुक्यातील तब्बल 24 हजार शेतकरी पिकविम्याच्या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. 20 टक्के शेतकऱ्यांनाच पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नुकसान झालेल्या सर्वच ठिकाणी पंचनामे करुनही विमा कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. विमा अधिकारी पैसे घेऊन पीकविमा देत असल्याचा गंभीर आरोपही शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
नांदगांव तालुक्यातील तब्बल 30 हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. मात्र, केवळ 6 हजार शेतकऱ्यांनाच पिकविम्याची रक्कम मिळाली असल्याने उर्वरीत शेतकऱ्यांना कधी मदत मिळेल, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सर्वात महत्त्वाचे काही गावात पैसे घेऊन किंवा स्थानिक पुढाऱ्यांनी सांगितलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले असल्याचा आरोपही शेतकरी करत आहे. याकडे कृषिमंत्री दादा भुसे यांनी लक्ष द्यावे व बळीराजाला वाचवावे, अशी मागणी शेतकरी व किसान सभेच्या वतीने करण्यात येत आहे
पिकविम्याचे पैसे द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू
नांदगांव तालुक्यातील सुमारे 30 हजार शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. मात्र, यापैकी केवळ 6 हजार शेतकऱ्यांनाच पीकविमा देण्यात आला आहे. उर्वरित 24 हजार शेतकरी यापासून वंचित आहे. येत्या 19 ऑगस्टपर्यंत जर सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याचे 100 टक्के पैसे मिळाले नाही तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू व होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल, असा इशारा किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे यांनी दिला आहे.
हेही वाचा - आमदारांच्या नियुक्तींसदर्भात राज्यपालांवर अदृश्य दबाव; छगन भुजबळांचा खोचक टोला