नाशिक - जिल्ह्यात बहुतांश भागात दुष्काळ असताना नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशात एका माजी सरपंचाने पाण्याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर येथे घडली. या घटनेनंतर घोटी पोलीस ठाण्यात माजी सरपंच यासह दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण रस्त्यावरील वाळविहीर येथे पाणी येत नसल्याने काही ग्रामस्थ विचारपूस करण्यासाठी सरपंचाच्या घरी गेले होते. यावेळी सरपंचांनी दुसऱ्या दिवशी पाहू असे सांगितले. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी पुन्हा विचारणा केली असता संशयित आरोपी माजी सरपंच प्रकाश लचके, नवसु लचके, कचरू ठाकरे यांना राग आला. त्यामुळे या तिघांनी दिलीप दोंदे यांच्या डोक्यात लोखंडी सळईने हल्ला चढवत लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेत दिलीप दोंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घोटी पोलीस ठाण्यात यासंबंधी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.