नाशिक - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले आहेत. शनिवारी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या बैठकीला खासदार संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला दिलासा देणारे निर्णय घोषित केले. मात्र, हे निर्णय समाजाची दिशाभूल करणारे असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला खासदार संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा मंजूर करणार, पालकमंत्र्यांचे आश्वासन