नाशिक - काश्मीरच्या श्रीनगर येथे कर्तव्यावर असताना अचानक बंदुकीची गोळी सुटल्याने जवान सागर चौधरी यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव सोमवारी लष्कराच्या गाडीने त्यांच्या मूळगावी आणण्यात आले होते. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काश्मीरमधील श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावत असताना बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने जवान सागर चौधरी यांचा 28 सप्टेंबरला अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव सोमवारी वायुसेनेच्या विमानाने ओझर विमानतळावर आणण्यात आले. तेथून लष्कराच्या गाडीने त्यांच्या मूळगावी निफाड येथील भरवस गावील त्यांचे पार्थिव आणण्यात आले आहे. त्यांच्यावर घराजवळील मोकळ्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडले, खासदार भारतीताई पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह परिसरातील असंख्य जनसमुदाय उपस्थित होता.
हेही वाचा - मांजरपाडा प्रकल्पामुळे येवला तालुक्यापुढील कायम दुष्काळी असलेला शब्द पुसला जाणार - छगन भुजबळ
यावेळी सैन्य दलाने तसेच पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून सागर चौधरी यांना मानवंदना दिली. 'भारत माताकी जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सागर चौधरी यांच्या अपघाती जाण्याने भरवस गावावर शोककळा पसरली आहे. सागर यांच्या घरची परिस्थिती गरिबीची असून त्यांच्यापश्चात पत्नी, एक वर्षाचा मुलगा शौर्य, आई, वडील २ बहिणी असा आप्त परिवार आहे
छगन भुजबळांनी सागर यांना वाहिली श्रद्धांजली
सागर चौधरी यांच्या १ वर्षाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ कुटुंबीयावर असेल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देत जवान सागर चौधरी यांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाचा - नाशकात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात