नाशिक - रेड व ऑरेंज झोनमधील सरसकट सर्व दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त एकल दुकानांना परवानगी देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी रात्री 42 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एकट्या नाशिक शहर व देवळाली परिसरातील 9 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे विशेष काळजी घेत एकल दुकानेच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील कंटेटमेंट झोन वगळता इतर ठिकाणची दुकाने सुरू करता येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, पोलीस प्रशासनाकडून या निर्णयाला फाटा देत उघडलेली दुकाने बंद करायला लावल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, बुधवारी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पत्रकार परिषद घेत शहरात दुकाने उघडण्यावरून निर्माण झालेल्या संभ्रमला पूर्णविराम दिला आहे.
मालेगाव व कंटेटमेंट झोन वगळता जिल्ह्यातील रेड व ऑरेंज झोनमधील एकल दुकानांना मुभा दिली होती. मात्र, हॉटेल, सलून, जीम व गर्दी होणारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, नाशिकच्या सराफ असोसिएशने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता १७ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.