नाशिक - महापालिकेच्या महासभेत आज (दि. 19 जाने.) शिवसैनिकांनी राडा घातला. नाशिक रोडला गेल्या काही महिन्यांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून लोकोप्रतिनिधी करत होते. मात्र, महापौरांकडून याबाबत काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर मंगळवारी (दि. 19 जाने.) शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत महासभेत गोंधळ घातला आहे.
महापौरांनी जाब देण्याऐवजी पळ काढला
ऑनलाइन महासभा सुरू असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत थेट महापौरांच्या दालनात घुसून महापौरांच्या समोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या महासभेत पाणीप्रश्नाअवर तोडगा न काढल्यास भाजप नगरसेवकांच्या घरात घुसून गोंधळ घालू, असा इशारा विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी दिला आहे. महापौरांनी नाशिक रोड विभागाची पाहणी करून दूषित पाणी पुरवठा होणार नाही, असे सांगितले होते. पण, अद्यापही दूषित पाणीपुरवठा होत असल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी जाब विचारला. पण, महापौरांनी जाब देण्याऐवजी पळ काढल्याचे बोरस्ते यांनी यावेळी सांगितले आहे.
...तर सेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा
नाशिक महापालिकेची महासभा आज (मंगळवार) दुपारी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. सभागहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर नाशिक रोड येथील नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. नाशिक रोड विभागासाठी 16 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन टाकण्यासाठी निविदा मागविण्यात आली असल्याचे सांगूनही शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. महापौरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ सुरू केला. पण, हा सर्व गोंधळ बघून महापौरांनी महासभा तहकूब करत सभागृहातून निघून गेले. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात नाशिक रोडचा पाणी प्रश्न असाच प्रलंबित राहिला तर शिवसेने स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला आहे.
हेही वाचा - नाशकातील कोविड सेंटर होतायेत बंद, कोरोनायोद्धेच पगारा विना