मालेगाव (नाशिक) ShahRukh Khan Fans Riot : जिल्ह्यातील मालेगाव येथे अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांनी सिनेमागृहात सुतळी बॉम्ब फोडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल शाहरुख खानच्या 'जवान' फिल्मच्या शेवटच्या शोमध्ये मालेगाव शहरातील कमलदीप थिएटरमध्ये शाहरुखच्या चाहत्यांचा जबरदस्त हंगामा पाहायला मिळाला. त्यांनी आनंदात फटाके, सुतळी बॉम्ब फोडले. ज्यामुळे सिनेमागृहात असलेल्या प्रेक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. शाहरुख खानच्या या चाहत्यांचा अतिउत्साह चांगलाच अंगलट आला असून त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
सिनेमागृहात फटाके फोडल्याने 'शो' बंद केला : सार्वजनिक ठिकाणी आणि सिनेमागृहात ज्वलनशील पदार्थ तसंच फटाक्यासारख्या पदार्थांना बंदी आहे. तरी देखील सिनेमागृहात शाहरुख खानचा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांकडे सुतळी बॉम्ब आणि फटाके आढळून आले. त्यांनी याचा वापरही थेट सिनेमागृहात केला. सिनेमागृहात पुढच्या बाजूला अचानकपणे फटाके लावल्याने मोठा आवाज झाला आणि त्यामुळे चित्रपट पाहण्यात मग्न असलेल्या अनेक प्रेक्षकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं होतं. हा प्रकार घडल्यानंतर त्वरित शेवटचा 'शो' मधूनच बंद करण्यात आला.
यापूर्वीही फटाके फोडण्याचा प्रकार घडल्याची माहिती : या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांना सिनेमागृहात पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी शाहरुख खानच्या काही चाहत्यांना, अतिउत्साही युवकांना ताब्यात घेतलं असून मालेगाव शहरातील रमजान पुरा पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्याचे काम सुरू आहे. भर सिनेमागृहात फटाक्याची आतिषबाजी करून एका प्रकारे हुल्लडबाजी करत जल्लोष केला. या फटाक्याच्या आतिषबाजीचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. या अगोदर देखील मालेगावच्या सिनेमागृहात असं फटाके फोडण्याचे प्रकार घडून गेले आहेत.
हुल्लडबाजीचा सामान्य प्रेक्षकांना फटका : शाहरुख खानचा 2023 वर्षातील 'जवान' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मालेगाव शहरात असलेल्या कमलदीप या चित्रपटगृहात जवान चित्रपटाचा 'शो' होता. या 'शो'च्या दरम्यान काही अतिउत्साही शाहरुख खानच्या चाहत्यांनी अशाप्रकारे हुल्लडबाजी केली. ज्यामुळे इतर प्रेक्षकांना त्रास सहन करावा लागला. चित्रपटाचा 'शो' या घटनेनंतर लगेच बंद केल्यामुळे काही निर्दोष प्रेक्षकांना मन मारून घराकडे परतावं लागलं.
हेही वाचा: