येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथे वनविभागाने छापा टाकून तस्करीसाठी साठवून ठेवलेले चंदन जप्त केले आहे. याप्रकरणी वनविभागाच्या पथकाने एका आरोपीस अटक केली आहे.
वन विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, खिर्डीसाठे येथील अनिल अण्णा शिंदे यांच्या राहत्या घरी छापा टाकला. त्यावेळी त्यांच्या घरातून राखाडी रंगाच्या पिशवीत चंदनाचे लाकूड कापून भरलेले मिळाले. हे चंदन तीन किलो वजनाचे होते. वन विभागाने अनिलला अटक केली आहे.
चंदनाचे झाड तोडून, त्यापासून तस्करीसाठी चंदन लाकूड घरात लपवून ठेवल्याप्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 कलम 42 व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे कलम 3 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने यापूर्वी किती चंदनाची झाडे तोडली, किती चंदन विकले, त्याचे कोणकोणते साथीदार आहेत, याचा तपास वन विभाग करीत आहे.