नाशिक : जिल्ह्याच्या येवल्यातील सैनिकांना मालमत्ता कर व इतर घरपट्टी तसेच पाणीपट्टी सूट मिळावी. अशा प्रकारची मागणी येवला शहर व तालुक्यातील आजी व माजी सैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या देशाचे सैनिक जीवाची पर्वा न करता देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून नि:स्वार्थ कर्तव्य बजावत उत्कृष्ट कामगिरी करत असतात. येवला नगरपरिषद व तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील मिळकतींना मालमत्ता कर व इतर सर्वसाधारण कर, घरपट्टी, पाणीपट्टी या सर्व करांमध्ये सूट मिळावी, अशी मागणी येवला शहर व तालुक्यातील आजी व माजी सैनिकांनी केली आहे. त्या आशयाचे पत्रही पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांना देण्यात आले आहे.
येवला तालुक्यात 700 ते 750 आजी व माजी सैनिक आहेत. त्यामुळे सदैव देशासाठी कर्तव्य बजावत असणाऱ्या सैनिकांना लादण्यात आलेले सर्व प्रकारच्या करपट्टी यावर्षी माफ करावे. यासाठी येवला तालुका सैनिक ग्रुपचे सुरेश धनवटे (माजी सैनिक) यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तरी आजी व माजी सैनिकांची ही मागणी मान्य करावी, अशी मागणी या आजी व माजी सैनिकांनी केलेली आहे.