नाशिक - रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वाहनातून प्रवास करणाऱ्या शेकडो परप्रांतीय नागरिकांना आज इगतपुरी रेल्वे स्थानकावर उतरवून देण्यात आले. यामुळे रेल्वे स्थानकावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, या सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाने पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना केले आहे.
सुरुवातीला त्याठिकाणी असलेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणाहून परतावून लावले. ज्या ट्रेनने आले त्याच ट्रेनने पुढे रवाना व्हा, अशा प्रकारचा सूचना वजा इशारा दिला. मात्र, त्यानंतर तेथे असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला ही माहिती कळताच आणि माध्यमांवर ही माहिती झळकल्यावर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. उभ्या असलेल्या रेल्वेत सर्व प्रवाशांना बसवत अनेकांना मुंबईच्या दिशेने रवाना केले. यामध्ये अनेकांनी रस्त्याने पायी चालत आपल्या गावाकडची वाट धरली. प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांच्या नजरचुकीने पुढे जात पोलिसांच्या हातून सुटका करून घेतली. काही वेळासाठी या परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.
तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या नेतृत्वामध्ये ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर तातडीने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार या ठिकाणी असलेली संपूर्ण गर्दी कमी करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेवर उभे राहिले होते. मात्र, पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने मोठी गर्दी टाळली.