नाशिक - सटाणा पोलीस व ठेंगोडा येथील ग्रामस्थांनी गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. गिरणा नदी पात्रात या गावठी दारूच्या भट्ट्या सुरू होत्या. नदीपात्रा लगतच्या दाट काटेरी झुडपात बिनदिक्कत भट्ट्या लाऊन गावठी दारूची निर्मिती सुरू होती. पोलीस व गावकऱ्यांनी अचानक छाप टाकल्याने शेकडो लिटर रसायन नष्ट करण्यात यश आले.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. पोलीस व गावकरी येत असल्याचा सुगावा लागताच आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी मद्याच्या दुकानांना टाळे असल्याने मद्यपींचा जीव चांगलाच कासावीस होत आहे. दारू मिळत नसल्याने भट्टीच्या गावठी दारूकडे मद्यपींची पावले वळू लागली आहेत. पर्यायी गावठी दारूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निर्जन ठिकाणी दारूच्या भट्ट्या लावून दारू निर्मितीचा सपाटा लावला जात आहे. बंदचा गैरफायदा घेत काही महाभाग चोरीछुपे दारू विकून जास्तीचे पैसे घेऊन गब्बर होऊ पाहत आहेत. मात्र, पोलिसांची करडी नजर काही ठिकाणी त्यांचा हा डाव हाणून पाडीत आहे.