मनमाड (नाशिक) - रस्ते आणि खड्डे हे एक समीकरण झाले असून नेहमीच हा विषय चर्चेचा कमी आणि वादाचा जास्त राहिला आहे. रस्ता कॉक्रिट असो किंवा डांबरी तो तयार केल्यानंतर मुदतीच्या आत या रस्त्यांची चाळण होण्याच्या घटना वाढल्या आहेत. असाच काहीसा प्रकार मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदौर महामार्गाच्या बाबती देखील घडला आहे. या रत्याचे डांबरीकरण करून अवघ्या १५ ते १८ दिवसाचा कालावधी देखील उलटलेला नसताना पहिल्या पावसातच या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप वाहनचालक व नागरिकांनी केला असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मनमाड शहरातून पुणे-इंदौर हा महामार्ग जातो या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते त्यात अवजड वाहनांची संख्या देखील मोठी आहे. या मार्गावर गेल्या काही महिन्या पासून ठिकठिकाणी खड्डे पडले होते. ऐन पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरण करून अवघे १५ ते १८ दिवस देखील झालेले नसताना, हलक्या पावसात या मार्गावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
खड्डा वाचविण्याच्या नादात अनेक वेळा अपघात देखील होत आहेत. विशेष म्हणजे या मार्गावर रेल्वेचा ओव्हर ब्रिज असून, खालून रेल्वे तर पुलावरून वाहने जातात. पुलावर देखील अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. नियमानुसार डांबरी रस्त्याची मुदत साधरणत: ४ ते ५ वर्ष असते. मात्र, या मार्गावर डांबरीकरण करण्यात आल्यानंतर अवघ्या १५ ते १८ दिवसातच खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे या कामाचा दर्जा कसा आहे हे स्पष्ट होत आहे. रस्त्याचे झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असून, याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबधित अधिकारी असल्याचा आरोप वाहनधारक व नागरिकांनी केला आहे.