नाशिक - गॉगल, पिनहोल कॅमेरा आणि चाळणीच्या माध्यमातून नाशिककरांनी सूर्यग्रहणाची अनुभूती घेतली. नाशिकमध्ये 72.14 टक्के ग्रहण दिसले.
नाशिक खगोल मंडळाकडून नाशिकच्या गंगापूर रोड येथील आकाशवाणी जवळील मैदानावर सूर्यग्रहण बघण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी खगोलशास्त्रज्ञांनी नागरिकांना सूर्यग्रहणाबाबत माहिती दिली. ही निसर्गाची किमया असून याबाबत समाजात असलेल्या अंधश्रद्धा मोडून काढायल्या हव्या असेही नागरिकांना समजावून सांगितले.
हेही वाचा - येवला शहरवासियांनी घेतला सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव
ग्रहण काळात काही खाऊ नये किंवा घराबाहेर पडू नये यासारख्या गोष्टी केवळ अंधश्रद्धा असल्याचे मत यावेळी शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. ही अंधश्रद्धा दुर करण्यासाठी नागरिकांना चॉकलेटचे वाटपही करण्यात आले. यावेळी सूर्यग्रहण बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ग्रहण बघताना कोणती काळजी घ्यावी याविषयी खगोलशास्त्रज्ञांनी नागरिकांना माहिती दिली. तसेच यावेळी गॉगल, पिनहोल कॅमेरा आणि चाळणीच्या माध्यमातून नागरिकांनी ग्रहण बघून या निसर्गाच्या किमयेचा आनंद घेतला.
तब्बल एक दशकानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजेच रिंग ऑफ फायर दिसले. भारतामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, उटी आदी भागात कंकणाकृती तर, महाराष्ट्र उर्वरित राज्यात खंडग्रास सूर्यग्रहण दिसले.
हेही वाचा - कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा, प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी'