नाशिक(दिंडोरी) - यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना नेहमीप्रमाणे पायी पंढरपूरला जाता आले नाही. अनेक वारकऱ्यांची अनेक दशकांची वारी यावर्षी खंडीत झाली. मात्र, जरी देहाने पंढरपूरला नसलो तरी मनाने पंढरपूरात असल्याची भावना नाशिक येथील श्रावण महाराज अहिरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली. गोरक्षा समितीचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या श्रावण महाराजांचीही 34 वर्षांची वारी खंडीत झाली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सालाबादप्रमाणे वारी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मानाच्या पालख्या वाहनांनी पंढरपूरला नेण्यास शासनाने परवानगी दिली. त्यानुसार आज मानाच्या सात पालख्या पंढरपूरात दाखल शिवशाही बसने दाखल झाल्या. सर्वसामान्य वारकऱ्यांनी आपापल्या गावातच विठ्ठलाचे नामस्मरण करत आषाढी साजरी केली, असे श्रावण महाराजांनी सांगितले.
वारीची परंपरा ही आद्य गुरू शिवशंकरापासून सुरू झालेली आहे. त्र्यंबकेश्वर येथून दरवर्षी वटसावित्री पौणिमेला निवृत्ती नाथांची पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करत असते. कोरोनामुळे सर्व सामान्य वारकरी पालखीच्या सोहळ्यापासून व दर्शनापासून वंचित राहिले.