नाशिक - शासकीय विश्रामगृहावरून एकाने उडी मारत आत्महत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. उडी मारणारी व्यक्ती सराफ व्यावसायिक असून विजय बिरारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बिरारी यांचे पेठ रोडवर दुकान आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
हैदराबादमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी घरफोड्या झाल्या होत्या. या प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून घरफोडीतील सोने नाशिक येथील सराफ व्यावसायिक बिरारी याच्याकडे विक्री केल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार हैदराबाद पोलिसांनी नाशिकमध्ये दाखल होऊन बिरारी याला ताब्यात घेतले होते. रात्री उशीर झाल्यामुळे पोलिसांनी नाशकात शासकीय विश्रामगृहात काल मुक्काम केला होता. आज दुपारी हैदराबाद पोलिसांची नजर चुकवून शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून बिरारी नामक सराफ व्यावसायिकाने आत्महत्या केली. आत्महत्येच्या घटनेनंतर तात्काळ त्यांना जिल्हा रुगणालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.