नाशिक - शहरात निओ मेट्रोची सेवा सुरू होणार असून नाशिक शहर अधिक स्मार्ट होणार आहे. निओ मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार आहे. सरकारच्या स्मार्ट सिटी करण्याच्या यादीत देशातील 100 शहरांमध्ये नाशिकचा समावेश झाला आहे.
स्मार्ट रस्ते, स्मार्ट पार्किंग ह्या सोबत आता लवकरच निओ मेट्रोच्या कामाला देखील सुरुवात होणार आहे. निओ मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीला चालना तर मिळणार आहे. त्या सोबत प्रवाशांचा प्रवासही सुखकर होणार आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही काही प्रमाणात कमी होणार आहे. ही निओ मेट्रो नक्की कशी धावणार आहे. याचे प्रेझेंटेशन तयार करण्यात आले आहे.
कशी असेल निओ मेट्रो आणि तिचा रस्ता-
25 मीटर लांबीची 250 प्रवासी क्षमता असलेली ही निओ मेट्रो असेल. वाहतुकीसाठी दोन कॉरिडॉर असतील. यातील पहिला मार्ग 22 किलोमीटरचा असेल. गंगापूर, शिवाजी नगर, श्रमिक नगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, द्वारका गांधी, सारडा सर्कल, द्वारका, गांधीनगर, नेहरुनगर, दत्त मंदिर, नाशिक रोड या मार्गावर धावेल.
तर दुसरा मार्ग 10 किलो मीटरचा असेल. त्यात गंगापूर, जलालपूर, नवश्या गणपती, थत्ते नगर, सीबीएस, मुंबई नाका अशी मेट्रो धावेल. तर तिसरा मार्ग 16 किलो मीटरचा असेल. यात मुंबई नाका ते सातपूर कॉलनी, वाया गरवारे अशी धावेल. या सर्व स्थानकांचे सीबीएस हे कॉमन स्थानक असणार आहे. एकूण 29 स्थानक मार्गावर 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. योग्यवेळी निओ मेट्रोचे मेट्रो रेल्वेत रूपांतरित करण्यात येणार आहे.