नाशिक - देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. 'शासन आपल्या दारी' या उपक्रमासाठी अजित पवार नाशिकमध्ये आले आहेत. त्यावेळी आमदार अहिरे यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार अहिरे यांचा अजित पवारांना पाठिंबा - आमदार सरोज अहिरे या आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होत्या. त्यामुळे त्या राष्ट्रवादीच्या नेमक्या कोणत्या गटात आहेत याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता त्यांनी अजित पवार यांच्या गटात जाण्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असताना आमदार अहिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही गटांनी जोर लावला होता. खासदार सुप्रिया सुळे व मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतली होती.
शरद पवार गटाला धक्का - अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. यामध्ये काही नेते अजित पवारांसोबत गेले तर काही शरद पवारांसोबत गेले. मात्र, आमदार सरोज अहिरे यांनी आपली भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे सरोज अहिरे कुणाला पाठिंबा देतील? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवारांचा वंदे भारतने प्रवास - शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने अजित पवार हे नाशिकमध्ये आले होते. वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत अजित पवार नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
हेही वाचा -