नाशिक : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अनेक आमदार सैरभैर झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत अनेक नेत्यांनी शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा दिली आहे. आमच्या विठ्ठलाभोवती बडवे जमल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. मात्र शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा देणे चुकीचे असून विठ्ठलाभोवती बडवे म्हणणे थांबवा, असे नाशिकचे महंत सुधीर दास महाराज यांनी स्पष्ट केले. यातून एका विशिष्ट कुटुंबाचा अपमान होत असल्याचा दावाही महंत सुधीरदास महाराज यांनी केला आहे.
शरद पवारांना विठ्ठलाची उपमा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना सोडून वेगळी भूमिका घेतली आहे. यावेळी अजित पवार गटाच्यासभेत मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अजित पवार यांनी शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा दिली होती. आमच्या विठ्ठलाभोवती बडवे जमल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र असा शब्दप्रयोग करत बडवे कुटुंबाचा अपमान केला या नेत्यांनी केल्याचा दावा महंत सुधीरदास महाराज यांनी केला आहे.
बडवे कुटुंबाने संभाळली विठ्ठलाची मूर्ती : राजकारण्यांकडून वारंवार या बडवे शब्दाचा प्रयोग होत असून तो थांबावा असे आवाहन महंत सुधीरदास महाराजांनी केले आहे. बडवे कुटुंबाने अनेक वर्षापासून विठ्ठलाचे पूजन करून विठ्ठलाची मूर्ती संभाळी आहे. अफजलखानाचा संपूर्ण आघात पंढरपूरला झाला असताना त्यावेळेस विठ्ठल मूर्तीचे बडवे परिवाराने संरक्षण केल्याचा दावा महंत सुधीरदास महाराज यांनी केला. त्यामुळे अशा परिवाराबद्दल अवमान करणे योग्य नाही. सध्या विठ्ठल मंदिरात कोणीही पुजारी बडवे परिवारातील नाहीत. त्यामुळे अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राज ठाकरे यांनी वारंवार बडवे हा शब्दप्रयोग केला असून तो थांबवा असे आवाहनही महंत सुधीरदास महाराज यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवारांना विठ्ठलाची उपमा चुकीची : परब्रम्ह स्वरूप असलेल्या विठ्ठलाला शरद पवारांची उपमा देणे आणि शरद पवार यांना विठ्ठल म्हणणे राजकारण्यांनी थांबावे. मागे देखील त्यांना जाणता राजा म्हणून संबोधण्यात आले होते. त्यामुळे वारकरी संप्रदायाचे हभप किर्तनकार, प्रवचनकार यांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे, असे आवाहनही महंत सुधीरदास महाराज यांनी केले आहे.
काय म्हणाले होते छगन भुजबळ : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अनेक दिग्गज नेते त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे शरद पवारांना वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले, हे स्वभाविक आहे. पण हे का झाले? लोक म्हणतात शरद पवारांचा फोटो का लावला? अरे साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. शरद पवारांनी त्या बडव्यांना बाजूला करावे आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला यावे अशी विनंती छगन भुजबळ यांनी केली. ते आमचे विठ्ठल आहेत, म्हणून त्यांचा फोटो लावल्याचेही छगन भुजबळ म्हणाले होते.
हेही वाचा -