नाशिक - कोरोनाचा प्रदुर्भाव झाल्यानंतर उपचारादरम्यान एक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून फरार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र, संबंधित रुग्णाला निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी संबंधित प्रकारानंतर केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील 19 वर्षीय तरुण शुक्रवारी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याचा प्रथम अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, आज सायंकाळी छातीचा एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जात असताना तो फरार झाला. परंतु नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी अवघ्या तीन तासात त्याला निफाडमधील विंचूर परिसरातून ताब्यात घेतले आहे.
भविष्यात या प्रकारच्या घटना टाळण्यासठी आवश्यक सुचना जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाला दिल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. संबंधित रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याला संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच रुग्णानेपळ काढल्याची माहिती निवासी जिल्हा चिकित्सक निखिल सौंदाणे यांनी दिली.