नाशिक - 'पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून तरी पेट्रोलचे भाव कमी करा' अशी विनंती नाशिककरांनी पंतप्रधानांना केली. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्यांनी ही मागणी केली.
गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल,डिझेल मध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक संतप्त झाले आहेत. नाशिकमध्ये पेट्रोलच्या भावाने शंभरी पार केली आहे. या दरवाढीमुळे कुटुंबाचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. या, पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोलच्या भावात कपात करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनती नाशिककर नागरिकांनी केली आहे.
मोदी साहेब आमच्याकडे लक्ष द्या -
नाशिकमध्ये पेट्रोलचे भाव रोज हळूहळू वाढत आहेत. ते 97 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आम्हाला रोज वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे इतके पैसे पेट्रोलवर खर्च करणे म्हणजे आमचे नुकसान आहे. सर्वसामान्य नागरिकांचे सरकार म्हणून आम्ही भाजपला निवडून दिले. मात्र, मोदीजी आमच्याकडे लक्ष देत नाही, अशी परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया नागरिांकांनी दिली.
हेही वाचा - शासन केवळ परिचारिकांवर गुन्हे दाखल करून डॉक्टर्सना वाचवण्याच्या प्रयत्नात - खासदार मेंढे
पेट्रोलचे भाव वाढले पण भाडे तेवढेच -
दरम्यान, पेट्रोलचे भाव सातत्याने वाढत आहेत. यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य रिक्षाचालकांचे प्रचंड नुकसान होत आहे. एकीकडे पेट्रोलचे भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र जादा भाडे देण्यास ग्राहक तयार नसल्याने आमची अडचण झाली आहे. आम्हाला कुटुंब कसे चालवावे? असा प्रश्न पडला आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घर खर्च कसा भागवावा, अशी चिंता वाटू लागली आहे. पेट्रोलचे भाव कमी झाले नाही तर आम्ही रिक्षाचालक रस्त्यावर उतरू, असा इशाराही रिक्षाचालकांनी दिला आहे.