नाशिक - निवडणूक आयोगाने नव्याने काढलेल्या निर्देशानुसार उमेदवारांना स्वतःवर असलेल्या गुन्ह्याची माहिती जाहिरातीद्वारे देणे बंधनकारक आहे. मात्र, अद्याप कुठल्याच उमेदवारांनी जाहिरात दिलेली नसल्याने निवडणूक आयोगाने सर्व उमेदवारांना स्मरण पत्र दिले आहे.
निवडणूक आयोगाने आज सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी आयोगाने निवडणूक आचारसंहिताचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार उमेदवारांनी आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती ३ वृत्तपत्रात आणि ३ जाहिराती इलेक्ट्रॉनिक मीडियात देणे बंधनकारक आहे. ही माहिती ज्या उमेदवारांनी दिली नाही, त्यासर्वांना निवडणूक आयोगाने स्मरण पत्र दिले आहे.
नाशिक मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ, शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे जाहिरात दिल्यास ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना समोरे जातील आणि त्याचा परिणाम मतदानावर होईल, अशी भीती उमेदवारांना वाटत आहे. त्यामुळे हे उमेदवार जाहिरात देण्यास धास्तावत असल्याचे बोलले जात आहे.