नाशिक - मालेगावनंतर आता नाशिक शहर कोरोनाचं नवीन हॉटस्पॉट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नाशिक शहरातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये शहरातील वडाळा गावात अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
रविवारी एकाच दिवसात जिल्ह्यात तब्बल ५५ रुग्णांची वाढ झाली आहे. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांच्या संख्येतही आता वाढ होऊ लागल्याने ही संख्या ७२ वर पोहोचली आहे. यामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, नाशिक शहरातील रुग्णसंख्या ही आता २०० पार गेली आहे. तर जिल्ह्यात आता एकूण रुग्णसंख्या ही १ हजार २३२ झाली आहे. तर आतापर्यंत ८२६ रूग्ण बरे झाले आहेत.
गेल्या १० दिवसात नाशिक शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या ५६ दिवसांत ६ वरून २१४ वर गेल्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या नाशिककरांच्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे.