नाशिक - नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येचा विचार केला तर नाशिक देशात अव्वल क्रमांकावर जाऊन पोहचला आहे. मागील महिन्याभराच्या आकडेवारी बघितली तर नाशिकने नागपूर, पुणे, मुंबईसह देशातील दिल्ली, लखनौ, बंगलोर, भोपाळ आदी शहरांना पिछाडीवर टाकले आहे. रोज सर्वधिक रुग्ण नाशिक शहरात आढळून येत आहे. सुरुवातीला कोरोना रुग्णांमध्ये देशात नागपूर हे शहर अव्वल होते. मात्र, काही दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोना बधितांचा आकडा वाढत असल्याने पहिल्या दहामध्ये नाशिक एक नंबरवर जाऊन पोहचले आहे.
शहरातील 1444 क्षत्रे प्रतिबंधित घोषित -
नाशिक शहराची लोकसंख्या 20 लाखांच्या जवळपास आहे. अशात मागील महिन्याभऱ्यापासून शहरात दररोज 1800 ते 2000 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडत असून दररोज 20 ते 22 जणांचा मृत्यू होत आहे. नाशिक शहरात आतापर्यंत 1 लाख 54 हजार 479 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यातील 1लाख 31 हजार 872 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 हजार 323 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाचे 21 हजार 284 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहे. शहरातील 1444 क्षत्रे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
सर्वाधिक वाचली गेलेली बातमी- निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO
कोरोना वॉररूम तयार -
मार्च महिन्यापासून नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. रोज 2 हजारापेक्षा अधिक नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून, शहरातील सरकारी, खाजगी हॉस्पिटल तसेच कोविड सेंटरमधील बेड फुल झाले आहेत. यात रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळण्यासाठी वाट बघावी लागत आहे. यामुळे नागरीकांचा होणारा मनस्ताप बघून नाशिक महानगर पालिकेने प्रत्येक विभागात कोरोनावॉर रूम सुरू केल्या आहेत. या ठिकाणी नागरीकांना हॉस्पिटलमधील बेडची माहिती दिली जात आहे. तसेच या कोरोना वॉररूममध्ये 24 तास शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरिकांचा बेफिकिरीपणा नडला -
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात कोरोना प्रादुर्भाव नगण्य होता. दिवसाला 100 पेक्षाही कमी रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेबरोबर नागरिकांनीदेखील सुटकेचा निश्वास सोडला होता. याच काळात शहरात मोठ्या प्रमाणत लग्न, मेळावे, राजकीय कार्यक्रम पार पडले. तसेच नागरिकसुद्धा विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत होते. हाच बेफिकिरीपणा नाशिककरांना नडला आणि मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना प्रादुर्भाव वाढत गेला.
संपूर्ण लॉकडाऊन गरजेचे -
नाशिक शहरात ज्या पद्धतीने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यावरून संपूर्ण लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. सरकारने लॉकडाऊन न करता, कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, तरीदेखील 50 टक्के नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, रेमडेसीवीरचा तुटवडा असून नागरिकांना मनस्ताप करावा लागत आहे. त्यामुळे 100 टक्के लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत तज्ञ डॉक्टर शाम पाटील यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - कोरोना परिस्थिती पाहता कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा; पंतप्रधान मोदींचे आवाहन..