नाशिक - शहरातील भोसला मिलिटरी स्कूलच्या गर्ल्स हॉस्टेलमधील चार ते पाच मुलींचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एम. एस. करपे असे या क्रीडा शिक्षकाचे नाव आहे. एका पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितल्यानंतर सर्व प्रकार समोर आला.
शाळा व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रारी करूनही शाळेची बदनामी होण्याच्या भीतीपोटी शिक्षकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षकाची हिम्मतवाढून त्याने अनेक मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शनिवारी घडलेल्या प्रकारानंतर संतप्त पालकांनी शिक्षकाविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनीदेखील सुरुवातीला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पालकांनी माध्यमांना बोलावत सर्व प्रकार समोर आणला.
पालकांचा आक्रमक पावित्रा आणि माध्यमांच्या उपस्थितीमुळे गंगापूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन शिक्षकाला अटक केली . मात्र नाशिकच्या सैनिकी शाळेतील मुलीच असुरक्षित असतील तर इतर शाळेतील मुलींचेकाय? असा सवाल या प्रकारानंतर उपस्थित केला जातोय.