नाशिक - शहरातील भूसंपादनसाठी सुरू असलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप मनसे नगरसेवक योगेश शेवरे यांनी केला होता. आजच्या महासभेत भूसंपदनाचा विषय न घेतल्याने शेवरेंनी महापौरांच्या घराबाहेर आंदोलन केले आहे. नाशिकमध्ये १५७ कोटी रुपयांचे भूसंपादन झाले आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे नगरसेवक योगेश शेवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनपाच्यावतिने संपादित करण्यात येत असलेल्या 'मिळकती' या बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. हा भूसंपादनाचा घाट फक्त मोठ्या बिल्डरांच्या हितासाठी असल्याचा गंभीर आरोप केला होता. भूसंपादनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून हे भूसंपादन रद्द करण्यात यावे, यासाठी नगरसेवक योगेश शेवरे यांनी ऑनलाइन महासभेत गोंधळ घातला. त्यानंतर थेट महापौरांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी आंदोलन केले. तसेच आदिवासी नगरसेवक असल्याने मला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा गंभीर आरोप देखील शेवरे यांनी केला.
भूसंपादनाचे हजारो कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रलंबित असताना 31 जमिनींच्या संपादनासाठी पालिकेतील काही लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक संगनमताने भुससंपादन घोटाळा करत असल्याचा शेवरे यांचा आरोप आहे. आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.