नाशिक - महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणाचा ताटातील घास हिरावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाच्या दडपणाखाली काम करत आहेत ? असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीतील काही मंत्री मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. योग्य वेळ आल्यावर 'त्या' मंत्राचे नाव समोर आणेन, असेही ते म्हणाले.
मेटे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडीला लक्ष्य केले. सर्वोच्च न्यायालयात काय भूमिका घेणार? आरक्षण भरती, सारथी, बलिदान दिलेल्या आंदोलकांबद्दल काय? गुन्हे मागे घेणार होते, त्याचे काय झाले? असे १३ मुद्दे आम्ही सरकारसमोर बैठकीत मांडले. मुख्यमंत्र्यांनी १८ तारखेपर्यंत यातून मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप सरकारने ठोस पावले उचललेली नाहीत. उद्धव ठाकरे कोणाच्या दबावाखाली आहेत का? असा सवाल उपस्थित करत सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री मराठा समाजाविरोधात असल्याचा आरोप मेटे यांनी केला.
सरकार निष्क्रिय असून पोलिसांचा उपयोग दडपशाहीसाठी होत आहे. सर्व मराठा समाज संघटना एकत्र करून एक दिशा, एक आंदोलन हा अजेंडा यापुढे असेल. उदयनराजे भोसले यांनी नेतृत्व करावे, ही माझी मागणी आहे. छत्रपतींचे १३वे वंशज म्हणून उदयनराजे यांचे नाव घेतल जाते. छत्रपती संभाजीराजे दिल्लीत खंबीर भूमिका मांडत आहे. दोन्ही छत्रपतींनी समाजाचे नेतृत्व करावे, अशी मागणी मेटे यांनी केली.
राज ठाकरेंचे तोंडभरून कौतुक
बाळासाहेब ठाकरे एकवचनी होते. मात्र, त्यांचे वारसदार उद्धव ठाकरे शब्द पाळत नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत आहे. आरक्षण देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरणार आहे. उद्धव ठाकरे फक्त आश्वासन देतात. राज ठाकरे थेट रस्त्यावर उतरतात. त्यांच्यात हाच फरक असल्याचे मेटे म्हणाले.
हेही वाचा- सराईत गुन्हेगाराची गोळ्या घालून हत्या; नाशिकमधील प्रकार