नाशिक : Manoj Jarange Patil Warning : मराठा आरक्षणावरून राज्यात राजकारण चांगलचं तापलं आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा आरक्षणाला कोणी विरोध केला तर सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांना भुजबळांना दिला आहे. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे आज (सोमवारी) बोलत होते.
नाव न घेता थेट इशारा : छगन भुजबळ माझ्या एकट्याच्या विरोधात बोलतात, म्हणून आम्ही बोललो. आता ते म्हणतात की, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. आम्हाला तेच पाहिजे होतं. विनाकारण कोणाला टार्गेट करण्याचा माझा धंदा नाही. तसेही आरक्षण देऊ नका, असे बोलणारे तुम्ही कोण? असा सवाल करत कुणी मराठा आरक्षणाला विरोध केला तर सोडणार नाही. मग तो कुणीही असो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता भुजबळांना दिला.
तर मराठा समाज तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचेल : छगन भुजबळ यांनी स्वतः सांगितले पाहिजे. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्या. कारण छगन भुजबळ यांना पाच मराठ्यांनी तरी मदत केली, त्याची थोडीशी जाण ठेवून तरी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या, असे म्हटले पाहिजे. त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना मदत करणारा सगळा मराठा समाज त्यांच्यावर नाराज होत आहे. ते इतका मराठा समाजाचा द्वेष का करतात? यासाठी मराठा समाजाने त्यांना मोठं केलं का? छगन भुजबळ उच्च दर्जाचे सर्वांत मोठे नेते आहेत. आम्ही कधी त्यांना तुम्ही वेगळ्या जातीचे आहात, असे म्हटले नाही. आमच्या बापजाद्याने एकदा तरी त्यांना मदत केली असेल. आम्हीही ओबीसीत आहोत. तुम्ही तुमचं खा, आम्हाला आमचे मिळू द्या, तुम्ही मराठा आरक्षणासाठी मदत केली तर मराठा समाज तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचेल असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
चार कार्यकर्ते जखमी : येवल्यात मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. सभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांचे जेसीबीवरून फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. यासाठी जवळपास पंधरा जेसीबी स्वागतासाठी उभे होते. या जेसीबीमध्ये काही कार्यकर्ते पुष्पवृष्टीसाठी सज्ज झाले असतानाच जेसीबीच्या बकेटवरील ऑपरेटरचे नियंत्रण सुटल्याने चार कार्यकर्ते खाली पडून गंभीर जखमी झाले. या कार्यकर्त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हेही वाचा:
- Vijay wadettiwar: राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत...विजय वडेट्टीवार यांचा घरचा आहेर
- Aditya Thackeray On Hospital : आरोग्य यंत्रणांची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते सरसावले, मात्र पुढे काय?...आदित्य ठाकरे
- MNS Toll Protest : 'टोल'वरुन मनसे आक्रमक; कार्यकर्ते असेपर्यंत गाड्या सोडल्या फुकट अन् नंतर आकारले पैसे