नाशिक - दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकरी दिल्ली येथे लाँग मार्चच्या माध्यमातून जात आहेत. शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चचे मध्यप्रदेश, राजस्थान येथे शेतकरी संघटनांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील लाँग मार्च दिल्ली येथे धडकणार
केंद्र सरकार लागू करत असलेले तीन शेतकरी कृषी कायदे रद्द करावे, यासाठी दिल्ली येथे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे कायदे पूर्णपणे रद्द करावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी नाशिकहून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील हजारो शेतकरी दिल्ली येथे रवाना झाले. शेतकऱ्यांच्या ह्या वाहन लाँग मार्चचे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान येथील शेतकरी संघटनांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. यावेळी शेतकरी समर्थनार्थ घोषणा देत शेतकऱ्यांच्या वाहनांवर पुष्पवृष्टी केली जात आहे. हा मोर्चा आज कोटावरून रात्री जयपूर येथे पोहोचणार असून उद्या 25 डिसेंबरला सकाळी जयपूर येथून निघून महाराष्ट्रातील लाँग मार्च दिल्ली येथे धडकणार आहे.
गुरुद्वारात जेवणाची आणि आरामाची व्यवस्था
नाशिकहुन दिल्ली येथे निघालेला लाँग मार्च मध्यप्रदेशमार्गे राजस्थानमधील कोटामध्ये पोहोचल्यानंतर कोटा येथील गुरुद्वारामध्ये या लाँग मार्चचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच गुरुद्वाराच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नाश्ता, जेवण, आंघोळ तसेच आरामाची व्यवस्था करण्यात आली. गुरुद्वारा प्रशासनाने दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी भारावून गेले होते.