नाशिक - जिल्ह्यातील कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणावर डाळिंब पीक घेतले जाते. परंतु दडी मारलेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.
लाखो रुपये वाया
कधी मुबलक पाऊस आणि अनुकूल हवामानाची साथ असल्यास मोठ्या काबाडकष्टाने लागवड केलेली पिके हाती येतात. मात्र अस्मानी आणि सुल्तानी अशी दोन्ही संकटे एकाच वेळी कोसळली तर शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात येते. सध्या दुर्दैवाने कसमादे परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी अशाच अस्मानी संकटातून जाताना दिसून येत आहेत. लाखो रुपये खर्च करून डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्याला शासनाच्या मदतीची आस लागून राहिली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी फिरवला नांगर
डाळिंबावरील विविध समस्येपैकी तेलकट डाग ही एक मोठी समस्या असून महिन्यांपासून तेल्या रोगाने डाळिंबाला ग्रासले आहे. त्यात कोणताही दिलासा मिळण्याऐवजी उलट वाढ होत चालल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेवर नांगर फिरवत बागा काढून टाकल्या आहेत.
'तेल्या रोगावर प्रभावी औषध काढावे'
तेल्या रोग आटोक्यात आणायचा तर त्यासाठी औषधांची मोठ्या प्रमाणात फवारणी करून बागांची निगा राखावी लागते. महागडी औषधे खरेदी करून योग्य नियोजनाद्वारे फवारणी करणे ही सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची बाब आहे. त्यासाठी कर्ज काढून बागा वाचविण्याचे प्रयत्न सुरू असले तरी शेवटी नशिबात काय लिहून ठेवले आहे, यांची शाश्वती नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक व मानसिक तणावाखाली असल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने तेल्या रोगावर प्रभावी औषध काढावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.