नाशिक- संपूर्ण भारतात लॉकडाऊन असताना कोणत्याही कामाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीने गांधीगिरी करत कोरोना आरतीद्वारे लोकांना घरी बसण्याचा सल्ला दिला.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी या गावी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे व जानोरी ग्रामपंचायतीचे लिपीक संजय बोस यांच्या कल्पनेतून ग्रामपंचायत प्रशासन ग्राम विकास अधिकारी व तलाठी मंडळ अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी पोलीस प्रशासन समिती या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या परिसरामध्ये कोरोना विषाणूजन्य रोगाची लागण होऊ नये या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरु आहेत.
गेल्या आठ दिवसापासून नाशिक विमानतळ परिसर व जानोरी मोहाडी जवळके दिंडोरी या पंचक्रोशीतून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही याची चाचणी करण्याचे काम आरोग्य विभागाचे कर्मचारी करत आहेत. ग्रामीण भागातील ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी आपले काम करत आहेत.
काही नागरिक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याने जानोरी गाव 1 ते 3 एप्रिल या कालावधीसाठी लाॅकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नागरिकांनी पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.