नाशिक - कोरोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी राज्य सरकारतर्फे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर हे निर्बंध येत्या १५ मेपर्यंत वाढवण्यात आहे. त्यामुळे नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसदेखील १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वेळेस इंडिया सिक्युरिटी प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
काही कामगार पॉझिटिव्ह असल्याने निर्णय -
जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे त्याचा फटका इंडिया सिक्युरिटी प्रेसलादेखील बसला आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील काही कामगारांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कामगारांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर येथील युनियनने व्यवस्थापनाशी चर्चा करून मागील आठवड्यामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ३० एप्रिलपर्यंत इंडिया सिक्युरिटी प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्य सरकारने हेच निर्बंध १५ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याने इंडिया सिक्युरिटी प्रेस येथील कर्मचारी युनियन आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनुसार आता पुढील १५ मेपर्यंत इंडिया सिक्युरिटी प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मजदूर संघाने केली होती मागणी -
कोरोनामुळे प्रेस कामगारांना त्रास होऊ नये म्हणून प्रेस १५ मे पर्यंत बंद ठेवावे, अशी मागणी एका पत्राद्वारे मजदूर संघाने प्रेसच्या महाप्रबंधक यांच्याकडे केली होती. त्यांनी ही मागणी मान्य केली असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यानी दिली आहे.
हेही वाचा - राज्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता - आरोग्यमंत्री राजेश टोपे