नाशिक - शहरातील समृद्धी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि सावी महिला बचत गटांकडून तयार करण्यात येत असलेल्या सीड राख्यांना राज्यासह इतर राज्यातून मोठी मागणी आहे. यामुळे लॉकडाऊन काळात महिलांना रोजगार मिळाला असून कुटुंबाला आर्थिक हातभार लागत आहे.
लॉकडाऊनमुळे बहुतांश सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली. ह्या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद झाल्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले. या काळात जिल्ह्यातील समृद्धी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि सावी महिला बचत गटातील महिलांनी आत्मनिर्भर होत मागील तीन महिन्यांपासून सीड राख्या बनवण्यास सुरवात केली. झेंडू आणि तुळशीच्या बिया वापरून तयार करण्यात येत असलेल्या या पर्यावरणपुरक राख्यांना नाशिक, मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबादसह जयपूर आणि चेन्नई येथून मोठी मागणी आहे. बच्चेकंपनीसाठी सुद्धा विविध आकार आणि रंगाच्या फुलांच्या रख्यानां बाजारपेठेत मोठी मागणी असून या सीड राख्या कुंडीत किंवा गार्डन मधील मातीत टाकल्यावर काही दिवसात ह्याचे रोप तयार होणार आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! कोरोनाबाधिताचा मृतदेह नातेवाईकांनी जबरददस्तीने नेला उचलून
आतापर्यंत बचत गटाच्या महिलांनी 7 ते 8 हजार राख्यांची विक्री केली असून अजूनही त्यांच्या रख्यांना मोठी मागणी आहे. 10 रुपयांपासून 130 रुपयांपर्यंत या पर्यावरणपुरक राख्यांची किंमत आहेत. या राख्या बनवताना आत्मिक समाधानासोबत कुटुंबासाठी आर्थिक हातभार लागत असल्याने ह्या महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
महिला बचत गटांना सामाजिक संस्थाची मदत -
लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे नाशिकच्या लेवा सखी मंडळाकडून महिला बचत गटांना रोजगार निर्मिती साठी मदत करण्यात येत आहे. त्यांना घरातच राहून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एम्ब्रॉयडरी शिलाई मशीन देण्यात येत असून त्याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात येत आहे.
सोशल डिस्टनसिंग ठेऊन राख्यांची निर्मिती -
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नाशिककरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे होममेड राख्यांची निर्मिती करत असलेल्या महिला सोशल डिस्टनसिंगचे पालन करत मास्क आणि सॅनिटायझर वापर करत आहे.