नाशिक - सातपूर येथील निळकंठेश्वर नगरातील थोरात पार्क इमारतीच्या छतावर वाळत असलेले कपडे काढताना तोल गेल्याने, उंचावरून पडून जखमी झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून तिची मृत्युशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. डिंपल शुक्ला असे या युवतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंपल शुक्ला (वय १८) ही मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घराच्या गॅलरीत वाळलेले कपडे काढत होती. गॅलरीच्या खालच्या बाजूस पडलेली ओढणी काढण्याचा प्रयत्न करत असतांना डिंपलचा पाय घसरला आणि उंचावरून तोल जाऊन ती खाली पडली, त्यावेळी तिच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यानंतर घरच्यांनी तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. अशातच डिंपलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
डिंपल ही आताच बारावीची परीक्षा 86 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. डिंपलच्या अचानक जाण्याने शुक्ला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार धात्रक आणि झेंडे करत असून याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.