नाशिक- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्यास ते अक्षय राहतं, असे म्हटलं जातं. त्यामुळे ग्राहक या दिवशी थोड्या फार प्रमाणात का होईना सोन्याची खरेदी करतात. यासाठी सराफांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोने खरेदीवर विशेष ऑफर, बक्षीस योजना दिल्या जातात, घडणावळीवर सूट दिली जाते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.
या वर्षी सोन्याच्या दागिने खरेदीवर विशेष विमा मोफत दिला जात आहे. त्यामुळे आता दागिन्यांची चोरी, गहाळ होण्याची काळजी करण्याची गरज नाही. ओ-लॉकरच्या माध्यमातून सराफांकडून खास अक्षय्य तृतीये निमित्त आता मोफत विमा योजना राबवली जात आहे.
भारतात पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने हा विमा काढला जात आहे. हा विमा काढताना त्याची संपूर्ण माहिती डिजिटलाइज केली जाते. सोने खरेदी केल्यानंतर फक्त पाच सेकंदामध्ये हा विमा तयार केला जातो. यासाठी सराफांकडून प्रबोधन केले जात आहे. ग्राहकही स्वतःहून या विम्याची विचारणा करू शकतात. सोनसाखळी चोरीच्या वाढलेल्या घटना पाहता या विम्याची गरज आणि फायदे लक्षात घेता एक वर्षाची वैधता यामध्ये दिली जात आहे. त्यानंतर ती वैधता वाढवून घेता येते. या विम्यामध्ये आग लागणे, चोरी होणे, घरफोडी, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्ती बरोबरच चेन स्नॅचिंग तसेच त्यावेळी झालेली मोडतोडही कव्हर होते. या विषयाची जागृती करण्यासाठी खास सणासुदीच्या दिवशी मोफत विमा घेण्याची संधी दिली जात आहे.
विमा कंपनीच्या नियमानुसार झालेल्या नुकसानीची माहिती तत्काळ विमा कंपनीला कळवावी लागते. सर्व कागदपत्रांसह कंपनीला माहिती दिल्यास सात दिवसात दावा दाखल होतो. चोरीच्या घटनांमध्ये २४ तासाच्या आता पोलिसात तक्रार द्यावी लागते आणि कागदपत्र पूर्ण असल्यास तत्काळ कारवाई सुरू होते. त्यामुळे अंगावर असलेल्या दागिन्यांचा विमा काढलेला असला तर त्याबरोबर येणारे संकट टळणार आहे, असे विमा कंपनीच्या माध्यमातून सांगितले जाते. या विम्यामुळे ग्राहकांच्या वस्तू सुरक्षित राहतात, तसेच महिलांच्या दागिन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विमा कवच म्हणता येईल.