नाशिक - बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याच्या मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 16 जून) सायंकाळी बिबट्याने आणखी एकाचा जीव घेतला आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील बाबळेश्वर गावात चार वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. त्याच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुंजन दशरथ नेरे (वय 4 वर्षे), असे मृत मुलीचे नाव आहे.
गुंजनची आई ही बाळंतपणासाठी बाबळेश्वर या गावी आली होती. सोमवारीच तिची प्रसुती झाली व दुसऱ्या रात्री ही दुर्दैवी घटना घडली. गुंजनच्या मानेवर बिबट्याने हल्ला केलेल्या जखमा आढळून आल्या. ती घरात न दिसल्याने तिचा शोध घरच्यांनी व गावकऱ्या सुरू केला होता. जवळच असलेल्या उसाच्या शिवारात ती आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वन अधिकारी विवेक भदाणे, मधुकर गोसावी व नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गुंजनचा मृतदेह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालय शवविच्छेदनसाठी दाखल केला. या परिसरात असणारा बिबट्या नरभक्षक झाला असावा, असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेने ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले असून बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा - नांदगाव शहर झाले कोरोनामुक्त; सर्व आठ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज