नाशिक - महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा मृतदेह आज (बुधवार) सकाळी सापडला आहे. मंगळवारी इगतपूरी तालुक्यातील मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेलेले शेखर गवळी सेल्फी घेत असताना अचानक दरीत कोसळले होते. आज सकाळपासून शोध कार्याला सुरूवात करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या पथकाला तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांचा मृतदेह मिळाला. ही घटना काल (मंगळवार) संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अंधार असल्याने व दरीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने स्थानिक प्रशासनाने शोधकार्य थांबवले होते. त्यानंतर आज (बुधवार) सकाळी पुन्हा शोधकार्याला सुरुवात करण्यात आली होती.
शेखर गवळी आणि त्यांचे काही मित्र इगतपुरी तालुक्यात असलेल्या मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले होते. एक उंच कठड्यावर उभे राहून सेल्फी घेत असताना ते २५० फूट खोल दरीत कोसळले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण शोध लागला नाही. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणेने शेखर गवळी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मंगळवारी संध्याकाळपर्यंत शोध लागला नव्हता. आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.
शेखर गवळी हे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी नोंदवली होती. तसेच महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाला त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. याशिवाय त्यांनी योग शिक्षक म्हणून देखील चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या अचानक जाण्याने क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट: येवल्यातील पैठणी व्यवसायाला कोट्यवधींचा फटका