नाशिक Nashik Leopards : सिडको भागातील सावता नगर लोकवस्तीमध्ये पहिला बिबट्या आढळून आला. शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये हा बिबट्याला नागरिकांनी बघितल्यानंतर तत्काळ वन विभागाला याची माहिती देण्यात आली, काही वेळातच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या लोकवस्तीचा हा परिसर असल्यामुळे या ठिकाणी बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अशात दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देत जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं.
एका दिवशी दोन बिबट्या जेरबंद : काही वेळातच गोविंद नगर परिसरात दुसरा बिबट्या धुमाकूळ घालत असल्याची बातमी समोर आली, तत्काळ वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. हा बिबट्या या परिसरातील डॉ. सुशील अहिरे यांच्या घरात घुसला होता. त्यावेळी गृहिणी प्रतिभा अहिरे घरात एकट्या होत्या. घाबरलेला हा बिबट्या घरातील कपाटावर जाऊन बसला होता. या बिबट्याला देखील दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाने बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन रेस्क्यू केलं.
बिबटया थेट कपाटावर : मी सकाळी उठले, मी माझ्या बेडरूममध्ये होते, माझे पती आमच्या डॉगला घेऊन फिरायला गेले होते. आमच्या घराचा दरवाजा उघडा होता, मी माझ्या बेडरूममध्ये असल्यामुळे मला कळलंच नाही की बिबट्या कधी घरात घुसला. जेव्हा माझे पती डॉगसोबत घरी आले तेव्हा आमचा डॉग जिन्यावरून वरती जाण्यास तयार नव्हता आणि तो विचित्र पद्धतीने भुंगायला लागला. तेव्हा माझ्या पतीला वाटलं की काहीतरी आहे. मग आम्ही आमच्या सर्व बेडरूमचे दरवाजे बंद केले. त्यानंतर माझ्या पतीने एक एक दरवाजा उघडून घरात बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा बिबट्या कपाटावर बसलेला होता. मग आम्ही सर्व दरवाजे बंद करून खाली आलो आणि वन विभागाला याची माहिती दिली. त्याच्यानंतर वन विभागाने त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देत रेस्क्यू केलं, अशी माहिती प्रतिभा अहिरे यांनी दिली. त्यावेळी गृहिणी प्रतिभा अहिरे घरात एकट्या होत्या. घाबरलेला हा बिबट्या घरातील कपाटावर जाऊन बसला होता. या बिबट्याला देखील दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाने बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन रेस्क्यू केलं.
पाच दिवसांपूर्वी आठ वर्षीय मुलगा ठार : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील निळवंडी शिवारात पाच ते सहा दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात पिंजरे लावले होते. यानंतर शुक्रवारी निळवंडी शिवारातच चिंच ओहोळ नाल्यात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात आला. हा बिबट्या मुलगा मृत झालेल्या घटनास्थळावरून 800 मीटरच्या अंतरावर जेरबंद करण्यात आला असून, याच बिबट्याने मुलावर हल्ला केला असावा असा अंदाज वन विभागामार्फत वर्तवण्यात येत आहे.
बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून, या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
अशी घ्यावी काळजी : नाशिक जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी ही चांगली जागा असते. ऊसतोड करतांना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचं दिसून आलं आहे. अशात शेतकऱ्यांनी, मजुरांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. ऊस तोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी, ज्यामुळे बिबटे, लांडगे, तरस वन प्राणी जवळ येणार नाही. अनेकवेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचं दिसून आलं आहे. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन वन विभागाने केलं आहे.
हेही वाचा -