नाशिक - कोरोनामुळे जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या 277 शाळांपैकी पाच शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. 3 विद्यार्थी, 3 शिक्षकेतर कर्मचारी व दोन शिक्षकच कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सिन्नर, निफाड, देवळा व मालेगाव तालुक्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली आहे.
850 पैकी 277 शाळा सुरू
शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरात महापालिका हद्द वगळता जिल्हा परिषदेच्या शाळांची घंटा वाजली नव्हती. मागील महिनाभरात जेथे एकही कोरोनाग्रस्त आढळला नाही, अशा गावांमध्येच शाळा सुरू करण्याची अट होती. त्यानुसार जिल्ह्यातील 850 पैकी 335 शाळा सुरू करण्याबाबत अहवाल प्राप्त झाले. यापैकी 277 शाळा सुरुही झाल्या. पण, सुरू झालेल्या शाळांपैकी सिन्नर, निफाड, देवळा आणि मालेगाव या चार तालुक्यांतील पाच शाळांमध्ये एकूण 8 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटीव्ह असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली आहे.
शाळा सुरू असलेल्या गावात पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्यास शाळा बंद
शाळा सुरू असलेल्या गावात पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्यास सुरक्षेच्या दृष्टिने शाळा बंद कराव्या असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून लागलीच त्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले आहे. दरम्यान, जेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांच्या संपर्कातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनाही विलगिकरणात ठेवत त्यांच्याही कोरोना चाचण्या करुन घेण्यात आल्या आहेत. आयसीएमआरच्या नियमांनुसार सर्व बाबींचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शाळेच्या एकूण परिस्थितीचा आढावा हा दर सोमवारी घेतला जातो आणि त्यानंतर पुढील कामकाज सुरू केले जाते. शासन आदेशानंतर या शाळांच्या बाबतीतही पुढील निर्णय घेतला जाईल.
58 शाळांची घंटा वाजलीच नाही
जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते बारावीच्या 335 शाळा सुरू करण्यात येणार होत्या. त्यासाठी शिक्षक, कर्मचारी यांच्या चाचण्या करण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार जेथील अहवाल आले तेथे निर्णय घेण्यात आला. पण, अनेक ठिकाणांचे अहवाल येणे बाकी असल्याने आणि काहींचे अहवाल पॉझीटीव्ह आढळल्याने अद्याप 58 ठिकाणांच्या शाळा सुरू करण्यात आल्या नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. लीना बनसोड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - पाणी कपातीचा चेंडू महापालिकेच्या कोर्टात - पालकमंत्री भुजबळ