नाशिक - नाशिक शहरातील प्रत्येक भागात आता कोरोनाने शिरकाव केला आहे. गोविंदनगर परिसरातील तीन अपार्टमेंटमध्ये तर, तब्बल 56 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तब्बल 56 रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ
नाशिक शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून गोविंदनगरमधील तीन अपार्टमेंटमध्ये तब्बल 56 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ही तीन अपार्टमेंट 14 दिवसांसाठी सील केले आहे. तीन अपार्टमेंटमध्ये 56 रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मनपा प्रशासनाने तत्काळ स्वस्तिश्री अपार्टमेंट, शारदा निकेतन अपार्टमेंट आणि शीतल पॅराडाईज या तीन अपार्टमेंट सील केले आहेत. या परिसरात जाण्यास पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. तसेच, या अपार्टमेंटमधील सर्वांच्या कोरोना चाचण्यादेखील केल्या जाणार आहेत. पुढील 14 दिवस हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
तीन अपार्टमेंटमध्ये हे बाधित रुग्ण आढळून आले असून या बधितांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यासह शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यात मागील दोन दिवसांपासून आढळून येणाऱ्या बाधितांची संख्या दोन हजारांच्या वर असून यात सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरामध्ये आढळून येत आहेत. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा अल्टीमेटम पालकमंत्र्यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दिला होता. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
प्रशासनाच्या चिंतेत भर.. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
नाशिक शहरांमध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हाधिकारी सूरज मांढरे महापालिका आयुक्त कैलास जाधव पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडेय यांच्यासह इतर अधिकारी रस्त्यावर उतरून नागरिकांना कोरोना रुग्ण संख्येवर प्रतिबंध करण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आणि काळजी घेण्याचा आवाहन करताना दिसून येत आहेत. मात्र, तरीही नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याने हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान, एकाच वेळी सिडको परिसरातील गोविंद नगर भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बाधित आढळून आल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. तर, एकाच परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर बाधित आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंतेत मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे. यामुळे हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासकीय अधिकार यांच्या वतीने करण्यात आले आहे.