मालेगाव(नाशिक)- मालेगावमध्ये काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने मालेगाव लवकरच कोरोनामुक्त होईल, असे चित्र होते. मात्र, गेल्या दोन दिवसात मालेगावमध्ये पुन्हा 55 नवीन रुग्णांची भर पडल्याने मालेगावकरांची चिंता वाढली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात आता 158 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून मालेगावच्या ग्रामीण भागात बाधित रुग्णांचा आकडा 20 इतका आहे. आतापर्यंत मालेगावमध्ये 73 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेल्या नागरीकांना गरजेच्या सेवा घरपोच देण्याचा विचार प्रशासन करत आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 2 हजार 119 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.
1 हजार 586 रुग्णांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून आता पर्यंत कोरोनामुळे 225 जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 69, चांदवड 7, सिन्नर 59, देवळा 2, दिंडोरी 22, निफाड 59, नांदगांव 16, येवला 41, त्र्यंबकेश्वर 12, कळवण 1, बागलाण 15, इगतपुरी 27, मालेगांव ग्रामीण 20 असे एकूण 350 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून सुरगाणा, पेठ, या दोन तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 39, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 158 तर जिल्ह्याबाहेरील 39 असे एकूण 1 हजार 586 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 3 हजार 930 रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यू
नाशिक ग्रामीण 42, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 99 मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून 73 व जिल्ह्या बाहेरील 11 अशा एकूण 225 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.