नाशिक - देशभरात सोमवारपासून फास्टॅग बंधनकारक केला आहे. त्यामुळे रोख टोल भरणाऱ्या रांगेमध्ये वाहनांची प्रचंड गर्दी झालेली आढळते आहे. तर फास्टॅगच्या रांगेतून येणाऱ्या विना फास्टॅग वाहनधारकांकडून दुप्पट टोल आकारला जात आहे. त्यामुळे पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर वाहनधारक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होण्याचे प्रकार वाढत आहे.
टोल नाका प्रशासन कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वाद
केंद्र शासनाने सोमवारपासून देशभरात फास्टॅग बंधनकारक केले आहे. मंगळवारी नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोल नाका परिसरात रोख टोल नाका भरणाऱ्या रांगेमध्ये वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र दिसले. अनेक वाहनधारकांनी फास्टॅग लावलेला नसल्याने या ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे टोलनाका परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान टोलनाका प्रशासनातील कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वाद होत असल्याच पाहायला मिळाले आहे. तर फास्टॅग असलेल्या वाहनांसाठी आणि नसलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र रांगा नसल्याने वाहचालकांनी रोष व्यक्त केला आहे.
फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल
फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांकडून टोल प्रशासन दुप्पट टोल आकारत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाद होण्याची शक्यता पाहता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. तसेच स्वतंत्र लाईन तयार करण्यात आल्या नसल्याने टोल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका अनेक वाहन धारकांना सहन करावा लागला. यामुळे टोल प्रशासनाने फास्टॅग असलेल्या आणि नसलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात हवी अशी मागणी वाहन धारकांनी केली आहे.
हेही वाचा - कालव्यात कोसळलेल्या बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा 39 वर